कालवड संगोपन खर्चात बचतीसाठी वापरा हि पद्धत

calf

कालवड संगोपन खर्चात बचतीसाठी वापरा हि पद्धत

दुधाच्या निम्म्या किमतीपेक्षा कमी खर्चात तयार होणारे, अधिक पोषक तत्त्वे असलेल्या मिल्क रिप्लेसरचा वापर योग्य पद्धतीने केल्यास कालवड संगोपन अधिक फायदेशीर आणि उत्तम दर्जाचे होऊ शकते. कालवडीची वाढ उत्तमप्रकारे, कमी खर्चात होण्यासाठी मिल्क रिप्लेसर एक चांगला पर्याय आहे. ज्यावेळेस दुधाला दर चांगला असतो, त्यावेळेस कालवडीला ३ ते ५ महिन्यांपर्यंत दूध पाजल्यास कालवड संगोपनाचा खर्च वाढतो. यासाठी मिल्क रिप्लेसरचा वापर योग्य पद्धतीने करणे फायदेशीर ठरते.

मिल्क रिप्लेसर म्हणजे काय ?

१) दुधाऐवजी, दूध भुकटी आणि इतर घटक मिळून दुधाच्या दर्जाचे आणि तितकेच पचनीय मिश्रण तयार करून कालवडींना वापरता येते, याला मिल्क रिप्लेसर म्हणतात.
२) मिल्क रिप्लेसर हे प्रामुख्याने स्कीम मिल्क पावडर, व्हे प्रोटीन, वनस्पतिजन्य प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, क्षार खनिजे, ॲन्टिऑक्सिडंट्स यापासून बनवलेले असते.
३) मिल्क रिप्लेसर पावडरमध्ये सर्वसाधारपणे २० ते २८ टक्के प्रथिने आणि स्निग्ध पदार्थाचे प्रमाण हे १८ ते २२ टक्के इतके असते.
४) मिल्क रिप्लेसर भुकटीच्या स्वरूपात असते, ज्यामध्ये पाणी मिसळून दुधाच्या दर्जाचे मिश्रण तयार करता येते. तयार झालेले मिश्रण हे संपूर्ण दुधाऐवजी किंवा काही प्रमाणात दूध कमी करून त्याऐवजी वापरता येते विविध सहकारी दूध संघ तसेच स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मिल्क रिप्लेसर बाजारात उपलब्ध आहे.

मिल्क रिप्लेसर बनवण्याची पद्धत

१) कंपनीच्या सूचनेनुसार पावडर मोजून घ्यावी.
२) स्वच्छ पिण्यालायक पाणी ३९ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाला गरम करावे.
३) कंपनीच्या सूचनेनुसार पावडरच्या प्रमाणात पाणी घेऊन त्यात थोडी थोडी पावडर टाकून हलवत राहावे. एकसारखे मिश्रण तयार करावे.
४) प्रत्येकवेळी ताजे मिश्रण करून लगेच पाजावे, म्हणजे त्याचे तापमान कमी होणार नाही, तसेच जास्तवेळ मिश्रण तयार करून ठेवल्यास त्यातील पावडर खाली बसते आणि त्यात जिवाणूंची वाढ होण्याची शक्यता असते. मिल्क रिप्लेसर नेहमी बाटलीने किंवा निप्पल असलेल्या बादलीने पाजावे.
५) मिश्रण बनवण्यासाठी आणि पाजण्यासाठी वापरलेली भांडी लगेच चांगली धुवून स्वच्छ करून वाळवावीत.
६) मिल्क रिप्लेसर पावडरची उघडलेली बॅग कोरड्या व थंड ठिकाणी ठेवावी, तिथे उंदीर व इतर प्राण्यांचा वावर नसावा.

मिल्क रिप्लेसरचा वापर

१) कालवडीच्या पोटाच्या चौथ्या कप्यात दुधाचे पचन होत असते. सुरवातीचे ३ ते ४ आठवडे रेनीन नावाच्या पाचकद्रव्याने दुधाचे पचन होत असते, ज्यात फक्त दुधात असणाऱ्या केसीन या प्रथिनाचे पचन होते.
२) त्यानंतर पेप्सीन नावाच्या पाचकद्रव्याने इतर प्रकारचे प्रथिने पचवण्याची शक्ती कालवडीस उपलब्ध होते. त्यामुळे दूध भुकटी किंवा व्हे प्रोटीन असलेले मिल्क रिप्लेसर सुरवातीचे ५ दिवस चीक पाजल्यानंतर लगेच सुरु करता येते. परंतु वनस्पतिजन्य प्रथिने जसे सोयाबीनचे पीठ असलेले मिल्क रिप्लेसर ४ आठवडे वयानंतर सुरु करावे.
३) कालवडीला दूध सुरु असताना मिल्क रिप्लेसर सुरु करायचे झाल्यास, एकदम बदल न करता दररोज थोडे थोडे दूध कमी करून त्याऐवजी मिल्क रिप्लेसर वाढवावे.

मिल्क रिप्लेसर वापरण्याचे प्रमाण

१) दुधाप्रमाणेच मिल्क रिप्लेसर द्रावण हे कालवडीच्या वजनाच्या १० ते १३ टक्के इतके पाजता येते.
२) यात सर्वसाधारणपणे १२५ ग्रॅम पावडर पासून एक लिटर दूध बनवले जाते, परंतु विविध कंपन्यांचे प्रमाण हे कमी अधिक असू शकते.
३) विविध शास्त्रीय अभ्यासातून हे दिसून आले आहे की, अधिक प्रमाणात दूध किंवा मिल्क रिप्लेसर खाऊ घातल्यास, कालवडीचे दूध बंद करण्यापूर्वी काल्फ स्टार्टर खाण्याचे प्रमाण कमी राहते. कालवड योग्य प्रमाणात काल्फ स्टार्टर ग्रहण करत नसेल आणि तिचे दूध बंद केल्यास, पूर्ण क्षमतेने इतर चारा व काल्फ स्टार्टर खाण्यासाठी २ ते ३ आठवडे लागतात. दरम्यानच्या काळात कालवडीची वाढ खुंटते.

मिल्क रिप्लेसर वापरातील अडचणी

१) मिल्क रिप्लेसर बनवताना पावडर मोजून घ्यावी लागते, पाणी योग्य तापमानाचे वापरावे लागते.
२) रोजच्या रोज ताजे बनवून द्यावे लागते, त्यामुळे त्यासाठी अधिक मनुष्यबळ व वेळ द्यावा लागतो. गोठ्यावर काम करणाऱ्या कामगारांना मिल्क रिप्लेसर बनवण्याचे प्रशिक्षण द्यावे लागते.
३) मिल्क रिप्लेसरची छोट्या पशुपालकांना उपयुक्तता कमी असते, एक दोन कालवडीसाठी रोज मिल्क रिप्लेसर द्रावण बनविणेसाठी पशुपालक उत्सुक नसतात.
४) अनेक वेळेस दुधाचे दर इतके कमी असतात की, दुधाऐवजी मिल्क रिप्लेसर पाजून विशेष असा काही आर्थिक फायदा होत नाही.
५) मिल्क रिप्लेसरची बाजारात अजूनही सर्वत्र उपलब्धता नाही. त्यामुळे त्याच्या नियमित वापरास मर्यादा येतात.

मिल्क रिप्लेसर वापराचे फायदे

१) मिल्क रिप्लेसरच्या वापरामुळे अधिक दूध विक्रीस उपलब्ध होते. मिल्क रिप्लेसर पासून तयार झालेले कमी किमतीचे दूध कालवड संगोपनाला वापरले गेल्याने एकूणच दुग्धव्यवसायातील फायदा वाढतो.
२) मिल्क रिप्लेसरमधून अधिकची जीवनसत्वे, क्षार खनिजे, प्रोबायोटीक कालवडीला सहजरित्या पुरवठा केले जातात, दुधामध्ये योग्य प्रमाणात हे मिसळून कालवडीला देणे सहज शक्य होत नाही.
३) मिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिजैविकांचा समावेश असल्यामुळे पचनसंस्थेतील आजार निर्माण करणाऱ्या जिवाणूंची संख्या कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे कालवडी आजारी पडण्याचे प्रमाण कमी राहते.
४) मिल्क रिप्लेसर मधील घटकांचे प्रमाण कायम एकसारखे राखणे शक्य असते किंवा आपल्या गरजेनुसार ते कमी अधिक करता येवू शकते, असे करणे दुधामध्ये शक्य होत नाही.
५) मिल्क रिप्लेसरचा कालवडींच्या आहारात वापर केल्यामुळे टीबी, जोन्स डिसीज, साल्मोनेल्ला, पास्चोरेल्ला, ई कोलाय व इतर काही आजाराचा गाईपासून होणारा प्रसार टाळला जातो.
६) कालवडींना गाईपासून लवकर वेगळे करता येते. गाईशिवाय संगोपन करणे शक्य होते. व्यावसायिक व मोठ्या प्रमाणावर कालवड संगोपन करायचे झाल्यास मिल्क रिप्लेसर वापरणे फायद्याचे ठरते.

मिल्क रिप्लेसर निवडताना घ्यावयाची काळजी


१) कालवडीची योग्य रीतीने वाढ होण्यासाठी मिल्क रिप्लेसर निवडताना काळजी घेणे गरजेचे आहे.
२) मिल्क रिप्लेसर मधील घटक कोणते आहेत आणि त्याची किंमत किती आहे ते अगोदर लक्षात घ्यावे, कारण सोयाबीन वापरलेले मिल्क रिप्लेसर ४ आठवडे पेक्षा कमी वयाच्या वासराला वापरता येत नाही आणि किंमत अधिक असेल तर ते वापरून आर्थिक फायदा होत नाही.
३) मिल्क रिप्लेसर निवडताना त्याची उपलब्धतेत सातत्य राहील याबाबत खात्री करून घ्यावी, जेणेकरून नियमित वापर करणे शक्य होईल.
४) मिल्क रिप्लेसर हे सहज व संपूर्णपणे पाण्यात मिसळले गेले पाहिजे. अनेक मिल्क रिप्लेसरचे एकजीव मिश्रण बनत नाही. त्यावेळेस कालवड संपूर्ण मिल्क रिप्लेसर प्यायली नाही तर काही घटक खाली तळाला साठून राहण्याची शक्यता असते.

सौजन्य : अग्रोवन

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: