बिजोत्पादनावर, महाबीजकडून ‘हा ’ पर्याय: शेतकऱ्यांना होणार फायदा

महाबीज बियाणे बातमी
हवामानातील बदलाचा परिणाम केवळ पिकांवरच झालेला नाही तर यामुळे आगामी हंगामातील बियाणांची समस्या देखील उद्भवणार आहे. आतापर्यंत बिजोत्पादन हे त्याच हंगामात घेतले जात होते. पण उत्पादनात घट झाल्याने महाबीजला देखील वेगळ्या पर्यायाची निवड करावी लागलेली आहे. म्हणूनच यंदा उन्हाळी हंगामात बिजोत्पादन केले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत जनजागृती केल्यामुळे अखेर राज्यात 25 हजार हेक्टरावर बिजोत्पादनाचा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे.
पेरणीच्या दरम्यान बियाणांची कमतरता भासू नये यासाठी काही कंपन्या ह्या बिजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतात. महाबीजकडूनही असा उपक्रम राबवला जातो. खरीप हंगामात पिकांचा झालेला पेरा याचा अंदाज बांधून बिजोत्पादन केले जाते. त्यामुळे बियाणांची कमतरता भासत नव्हती. पण वातावरणातील बदलाचा परिणाम बियाणांच्या उत्पादनावरही होत आहे. आगामी खरिपात बियाणांची कमतरता भासेल यामुळे प्रथमच उन्हाळी हंगामात बिजोत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. त्यामुळे अतिवृष्टी आणि हवामानातील बदलाचा परिणाम केवळ त्या हंगामावरच नाही तर आगामी हंगामावरही झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच उन्हाळी हंगामात तब्बल 25 हजार हेक्टरावर पेरा करण्यात आलेला आहे.
महाबिजकडून या वाणांची निवड :
वाणांचा अभ्यास करुनच लागवड केली जाते. उन्हाळी हंगामासाठी 10 वर्षाच्या आतमधील वाणांची महाबिजने निवड केलेली आहे, यामध्ये प्रामुख्याने फुले संगम, फुले किमया, एमएयूएस 612, एमएयूएस 158, एमएयूएस 162, एमएयूएस 71, इत्यादी वाणांची निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाबिजने जनजागृती करुन शेतकऱ्यांना बिजोत्पादन घेण्याबाबत जनजागृती केली होती. शिवाय बिजोत्पादनाचे महत्व पटवून सांगून क्षेत्रात वाढ केली आहे. यंदा तब्बल 25 हजार हेक्टरावर बिजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा आहे.
बियाणे उत्पादन का घटत आहे :
खरीप हंगामातील पिकांचा पेरा लक्षात घेऊनच बिजोत्पादनाचा कार्यक्रम हा राबवला जात असतो. मात्र, खरिपातील पिकांच्या उत्पादनावर यंदा वातावरण बदलाचा परिणाम झाला होता. त्यामुळे पिकांबरोबर बियाणांचे उत्पादनही घटले. आगामी खरीप हंगामात बियाणांची कमतरता भासू नये म्हणून महाबिजकडून उन्हाळी हंगामात बिजोत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे. घटलेल्या बियाणांची कसर भरुन काढण्याचा महाबिजचा प्रयत्न आहे.
बिजोत्पादन केल्यावर शेतकऱ्यांना काय? :
पायाभूत बियाण्यांची किंमत आणि प्रमाणित बियाणे उत्पादनासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. यामध्ये प्रत्यक्ष खर्चाच्या 100 टक्के किंवा कमी कमी 15 हजार रुपये प्रती हेक्टर इतके अनुदान शेतकऱ्यांना मिळते. त्यासाठी एका खातेदाराने कमाल 10 हेक्टर बिजोत्पादन क्षेत्रात बीजोत्पादन केले तर 1 लाख 50 हजार रुपये अनुदान हे योजनेअंतर्गत मिळते. बिजोत्पादक शेतकऱ्याला अनुदानाची मागणी ही संबंधित कृषी सहाय्यकाकडे करावी लागते. शिवाय आवश्यक कागदपत्रेही जोडावी लागणार आहेत. यामध्ये पायाभूत बियाणे खरेदी पावतीची मुळ प्रत. बीज प्रमाणीकरण यंत्रणे कडे शुल्क अदा केल्याच्या पावतीची मुळ प्रत, कृषी सहाय्यक यांचा प्रक्षेत्र पाहणी केलेला अहवाल जोडावा लागणार आहे.