२ ते ४ फेब्रुवारीस पाऊस पडू शकतो: हवामान खते अंदाज

Rain news
राज्यात आठवड्यापासून थंडीची लाट सुरू आहे. उत्तर मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसतायेत. महाराष्ट्रातील जवळपास १६ जिल्ह्यांमध्ये तापमान १० अंशांच्या खाली गेलं आहे . पण आता ऐन थंडीत राज्यात पावसाच्या सरी बरसणार आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
गेल्या २४ तासांत अनेक भागांत कमी तापमानाची नोंद करण्यात आली असून उत्तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड इथं थंडीची लाट होती. मात्र, आता काही ठिकाणी लाट ओसरणार आहे.
हवामान खात्याने मध्य आणि पश्चिम भारतासाठी नवा अलर्ट जारी केला आहे. यामध्ये फक्त तापमानात घट होणार नाही, तर २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पाऊसही पडू शकतो असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
या राज्यांना पावसाचा इशारा
उत्तर-पश्चिम भारतात पुढचे चार दिवस ताशी १०-२० कि.मी. वेगाने वारे वाहतील. यामुळे या भागात तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने खाली येऊ शकतं. मध्य प्रदेशातील काही भागात थंडीची लाट कायम राहील. याशिवाय छत्तीसगड आणि विदर्भातही तापमानात घट नोंदवली जाईल. २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात हलक्या पावसाच्या सरी येऊ शकतात.