कांदा बाजारभाव मध्ये झाले मोठे बदल

Onion Market rate news
पश्चिम बंगालमधील सुखसागरसह स्थानिक कांद्यामुळे बांगलादेशमधील निर्यात थांबल्यात जमा आहे. त्याचवेळी पाकिस्तानपेक्षा कमी भाव असल्याने भारतीय कांद्याला indian onion मलेशिया, सिंगापूर, दुबईमध्ये मागणी वाढली, परंतु जहाज आणि कंटेनरच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्यातदारांना भेडसावत आहे. अशा परिस्थितीत कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात रांगडा कांद्याची आवक वाढल्याने एका आठवड्यात क्विंटलचा सरासरी भाव ३०० रुपयांनी कमी झाला आहे.
उन्हाळ कांद्याची आवक सुरु झाली असून त्यास क्विंटलला ८०० ते हजार रुपयांपर्यंत आज सरासरी भाव मिळाला. उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत कांद्याची विक्री करावी लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी करण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, राज्यात रांगडा कांद्याचे क्षेत्र ४ लाख ५३ हजार हेक्टरपर्यंत असून गेल्यावर्षीच्या तुलनेत ४८ हजार हेक्टरने अधिक आहे.
Rangda Onion रांगडा कांद्याचा टिकाऊ कालावधी कमी असून आवक अधिक वाढू लागल्याने शेतकऱ्यांचा कल विक्रीकडे वाढत चालला आहे. पावसाने वेळापत्रकात बिघाड केल्याने यंदा पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत रांगडा कांद्याची आवक बाजारात होत राहणार आहे. अशातच, उन्हाळ कांदा शेतकऱ्यांनी विक्रीला आणल्यास भावात आणखी घसरण होण्याची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे राज्यातील उन्हाळ कांद्याचे क्षेत्र दोन लाख ३९ हेक्टरपर्यंत पोचले असून गेल्यावर्षीपेक्षा २५ हजार हेक्टरने कमी आहे.
मात्र नैसर्गिक परिस्थितीमुळे यंदा उन्हाळ कांद्याच्या उत्पादकतेत घट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. कांद्याच्या भावातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर रांगडा कांद्याची विक्री होईपर्यंत शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा बाजारात विक्रीसाठी आणू नये, असा सल्ला अभ्यासक देत आहेत. उन्हाळ कांद्याची टिकाऊ क्षमता अधिक असल्याचे अभ्यासक अधोरेखित करत आहेत.

मार्चमध्ये भाव घसरतात : कांद्याचे मार्चमध्ये भाव घसरतात असा आजवरचा अनुभव यंदा ‘रिपीट” झाला आहे. गेल्यावर्षी १९ फेब्रुवारीला ३५ रुपये किलो भावाने विकल्या गेलेल्या कांद्याला मार्चमध्ये १२ रुपये भाव मिळाला होता. यंदा दोन हजार रुपयांपर्यंत भाव असताना आता एक हजाराच्या कमी भावात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतो आहे.
आर्थिक वर्षाअखेरीमुळे बाजारपेठा काही दिवस बंद राहतात. त्यानंतर लिलाव सुरु झाल्यावर कांद्याचे भाव स्थिरावतील, अशी शक्यता अभ्यासकांकडून वर्तवली जात आहे. पण शेवटी हे ‘जर आणि तर”ची स्थिती राहणार आहे. ही सारी स्थिती पाहता, कांद्याच्या निर्यातीला वेग आल्यास स्थानिक बाजारपेठेतील ढासळणाऱ्या भावावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे, असे शेतकऱ्यांना वाटते आहे. २०१८-१९ मध्ये राज्यातून १३ लाख २० हजार, तर देशातून २१ लाख ८० हजार टन कांद्याची निर्यात झाली होती. गेल्यावर्षी राज्यातून जवळपास ८ लाख, तर देशातून १५ लाख ७० हजार टन कांद्याची निर्यात झाली होती.
सकाळ