कृषी पर्यटन हा कृषी पूरक व्यवसाय होण्याच्या मोठ्या संधी : हाडवळे

agri

कृषी पर्यटन दिन विशेष

अनिल देशपांडे: राहुरी

Agri Tourism कृषी पर्यटन हा कृषी पूरक व्यवसाय म्हणून विकसित होण्याच्या मोठ्या संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत .कृषी पर्यटन बदलत्या काळाची गरज असून कृषी पूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटनाकडे बघितले पाहिजे असे प्रतिपादन राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील पर्यटन प्रशिक्षक मनोज हाडवळे यांनी केले .

अकरा वर्षांपूर्वी कृषी पर्यटनाची पाऊलवाट पाराशर कृषी पर्यटन म्हणून मनोज हाडवले यांनी सुरु केली. या वेळी या बाबतीत काहीच काम झालेले नव्हते. अकरा वर्षापूर्वी कृषी पर्यटन म्हणून त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली .त्यावेळेच्या कृषी पर्यटनाच्या संकल्पनेत आज आमूलाग्र बदल झाला आहे .प्राथमिक अवस्थेत बैलगाडी आणि चुलीवरचे जेवण म्हणजे कृषी पर्यटन अशी क्रेझ होती परंतु अलीकडच्या काळात त्यामध्ये अनेक बदल झाले आहेत .

ग्रामीण भागातील कृषी संस्कृती विकसित आहेच. इतरांना आकर्षित करण्यासारख्या अनेक गोष्टी शेतीत उपलब्ध आहेतच मात्र त्याचे त्या पद्धतीने सादरीकरण महत्त्वाचे आहे. मनोज हाडवळे यांनी अकरा वर्षांपूर्वी जुन्नर येथे 2011 मध्ये द्राक्ष महोत्सव सुरू केला. त्यास पुणे महानगरातून चांगला प्रतिसाद मिळाला .नंतर त्यांनी कृषी पर्यटन साठी संस्था स्थापन केली.आता द्राक्ष महोत्सव जुन्नर तालुक्याचा कृषी पर्यटन महोत्सव झाला आहे.

कृषी पर्यटनात खूप संधी उपलब्ध आहेत . शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये शाश्वतता नसते. बाजारभाव ,शेती उत्पादनातील अनिश्चितता अशा संकटाचा त्याला सामना करावा लागतो .त्या अनुषंगाने शहरातील पर्यटकांची बाजारपेठ आपण आपल्या शेतात उपलब्ध करून देत असतो. कृषीपूरक उत्पादनाची बाजारपेठच आपण आपल्या शेतामध्ये आणत असतो.प्रक्रिया युक्त शेतीमाल ,ताजा सेंद्रिय शेतीमाल आपण आपल्या बाजारभावाप्रमाणे या कृषी पर्यटकांना विक्री करू शकतो. कृषी विद्यापीठे, कृषी प्रक्रिया उद्योग संस्था, बाजार समित्या, कृषी महाविद्यालय व शेतकरी असे सर्वजण कृषी पर्यटन दृष्टीने विशेष कार्य करू शकतात .

स्थानिक वस्तूंचा वापर करून झोपडी, कुडाच्या भिंती ,शेणानं सारवलेली जमीन ,बदलत्या व वाढत्या तापमानाच्या धोक्यापासून दूर थंडगार असे नैसर्गिक वातावरण निर्मिती त्यांनी त्यांच्या केंद्रावर केली .परदेशातील एकवीस देशातून पर्यटकांनी त्यांच्या या केंद्रास भेट दिली. वर्षभरात हजार बाराशे पर्यटक पाराशर कृषी पर्यटन केंद्रास भेट देतात.शेतीतील काही कार्याचा अनुभव घेण्याच्या सुविधाही त्यांनी केद्रात उपलब्ध करून दिल्या आहेत. कृषी पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी ठिकठिकाणी आता कार्यशाळा भरविल्या जाताहेत .त्या माध्यमातून आज पर्यंत अशा अनेक प्रशिक्षण केंद्रातून त्यांनी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय बीज निगम यांनी हरियाणा व राजस्थानमध्ये ही प्रशिक्षक म्हणून मनोज हाडवले यांना बोलावले.

कृषी महाविद्यालयाच्या कमवा व शिका या योजनेतून या दिशेने बरेच काही करता येईल .आपल्या शेताला आपली कंपनी म्हणून आपण विकसित केले पाहिजे.आपल्या शेतात काय उपलब्ध आहे. परिसरात इतरांना आकर्षित करता येऊ शकेल असे काय आहे.या पद्धतीचे परिसर वाचन शेतकऱ्यांना केले पाहिजे. त्या पद्धतीने इतरांना आकर्षित होईल या पद्धतीने त्याची मांडणी केली पाहिजे .यासाठी फार मोठा खर्च करावा लागतो असे नाही राहण्यासाठी च्या किमान सुविधा, निसर्गरम्य वातावरण हे कृषी पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक आहे. पर्यटनासाठी आलेल्या माणसाला तिथे विरंगुळा मिळाला पाहिजे. शहरात जो आनंद मिळू शकत नाही असे त्याला वाटते तो या केद्रात मिळाला पाहिजे .कृषी पर्यटनामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. आपल्या शेत चांगले ठेवले जाते. कामात उत्साह निर्माण होतो. पर्यटक आपल्या कामाच कौतुक करतात त्यातून आपले संवाद कौशल्य वाढीस लागते.आपले करिअर या दृष्टीने कृषी पर्यटन या विषयाकडे बघता आले पाहिजे. ग्रामीण भागातील कृषी संस्कृतीचे शहरी भागात अजूनही आकर्षण असते .मातीशी पर्यटनाचे नाते जोडणारे पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन होय .

सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वदूर समाजापर्यंत आपण कृषी पर्यटन संकल्पना नेवू शकतो .कृषी पर्यटनाकडे बघण्याचा शेतकऱ्यांचा आणि पर्यटकांच्या दृष्टीकोनात दिवसेंदिवस बदल होत आहे.हे चित्र आशावादी आहे. येत्या दहा वर्षात कृषी पूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन विकसित होऊ शकते .नौकरी किती जणांना देणार याला मर्यादा आहेत. रोजगार मागण्या ऐवजी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कृषी पर्यटनास चालना दिली पाहिजे. एक दिवशीय सहल किंवा निवासी पर्यटन अशा दोन प्रकारे याकडे बघता येईल.

मनोज हाडवळे कृषी पर्यटक केद्राचे प्रशिक्षक असून आज पर्यंत राज्यभरात अनेक कार्यशाळा त्यांनी घेतल्या आहेत. राज्याचे ते सल्लागार समिती वर ही कार्यरत आहेत. या बाबतच्या राज्याचा कृषी पर्यटनधोरणाचा मसुदा त्यांनी तयार केला आहे. आल्हाददायक निसर्ग, सोबत बैलगाडीची सवारी, शेतीविषयक शास्त्रोक्त माहिती, अवजारे व त्यांचे प्रात्याक्षिक,शेतावर नजर ठेवण्यासाठी केलेले मचाण, त्यावर फिरवण्याची गोफण, शेततळे, लहान मुलांचे खेळ (विटी-दांडू,भोवरा आदि), व वृध्दांना फिरण्यासाठी ट्रॅक अशा अनेक गोष्टींबरोबरच राहण्याची उत्तम सोय, झुणका -भाकर, ठेचा, लसणाची चटणी अशा संपूर्ण खेड्याचा अनुभव पर्यटकांना मिळतो.जो त्यांना हवाहवासा वाटतो. पर्यटन केंद्रात खेड्यातील साधे जीवन परावर्तित होत असून परिसरातील संस्कृती जतन केली जाते आहे. जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी कृषी पर्यटन केद्रामुळे हातभार लागत आहे.

कोले तालुक्यात कुमशेत व फोफसंडी येथे कृषी पर्यटनाचे प्रस्ताव पाठवलेले आहेत. कृषी पर्यटनामध्ये शेतकऱ्यांना गावरान जेवण, कृषी कार्यातील शेतीतील कामाचा अनुभव दिल्यामुळे पर्यटकांना त्याविषयी विशेष आकर्षण आहे .यासाठी विशेष निधी उपलब्ध केला जात नसला तरी कृषी विभागाच्या विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीमध्ये कृषी पर्यटकांच्या प्रस्ताव वास प्राधान्य दिले जात असल्याचे संगमनेरचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी सांगितले.

कृषी पर्यटनाच्या जिल्ह्यात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. शेतकरी आता त्या साठी पुढे येत आहेत. शहरी भागातील लोकांना कृषी पर्यटनाचे आकर्षण आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते.शेती व शेतकऱ्यात या दृष्टीने अधिक क्षमता विकसित होवू शकतात.

महेंद्र ठोकळे: तालुका कृषी अधिकारी राहुरी

%d bloggers like this: